करमाळा: व्हायरल व्हिडिओद्वारे करमाळा तालुक्यातील मांगी परिसरात गुरुवारी सायंकाळी उशिरा बिबट्या दिसल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे तो प्राणी बिबट्या नसल्याचा दावा करत शुक्रवारी सक्षम अधिकारी भेट देऊन पाहणी करतील, असे सांगितले आहे.
मांगी शिवारातील शरद शिंदे यांच्या क्षेत्रात गुरुवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी ऊस तोडणी कामगाराच्या अकरा वर्षांच्या दीपक कचरू ठाकरे याला बिबट्याचे दर्शन झाले असून त्याने त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला. त्यानंतर मांगी गावात येऊन ही माहिती मांगी सोसायटीचे चेअरमन सुजित बागल यांना दिली. सुजित बागल यांनी तात्काळ वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही माहिती दिली.
व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी वनविभागाचे बाबासाहेब लटके यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर व्हिडिओ लांबून आणि अस्पष्ट काढलेला असला, तरी हा बिबट्या सदृश्य प्राण्याची हालचाल बिबट्याप्रमाणे नसून प्रथम दर्शनी हा प्राणी मांजर वर्गीव म्हणजे रान मांजर असण्याची शक्यता आहे. सदर व्हिडिओ काढते वेळी वन विभागाचे वॉचमन गणपत जाधव यांच्या मुलानेही हा प्राणी प्रत्यक्ष पाहिल्याचे आणि तो मांजर वर्गीय म्हणजे राज मांजर असण्याची शक्यता वर्तवली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवार 17 रोजी वन विभागाचे अधिकारी सदर ठिकाणच्या ठशांची पाहणी करून याबाबत अधिक माहिती देतील, असे लटके यांनी सांगितले आहे.


