सोलापूर : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून बरीच चर्चा रंगली आहे. परंतु, ऑनलाईन रमी गेमचं व्यसन आणि त्या व्यसनापायी असंख्य तरुण कर्जबाजारी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये कित्येकांनी तर आपली शेतजमीन गहाण ठेवल्याची धक्कादायक बाब उजेडात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील जय जाधव या तरुणावर ऑनलाईन गेमच्या व्यसनापायी 80 लाखांचे कर्ज झाले आहे. अवघ्या 26 व्या वर्षी रमीच्या नादात त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झाले.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणारा जय जाधव हा तरुण शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. तो रमीच्या नादात इतका गुरफटला की, त्याच्यावर सुमारे 80 लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. जय याने रिअल इस्टेट व्यवसायातून कमावलेले 23 लाख, मित्रांकडून घेतलेले 20 लाखांचं कर्ज, दीड एकर शेतजमीन, स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेवून आणलेले पैसे, हे सर्व काही रमी गेममधील जुगारात गमावले आहेत.
याबद्दल जयने सांगताना जनतेला आवाहन केले आहे की, ‘मंत्र्याचा व्हिडीओ पाहून चुकीची प्रेरणा घेऊ नका. आपलं झालेलं नुकसान पुरे, आता थांबा’ अशा शब्दांमध्ये त्याने ऑनलाईन गेमच्या नादाला लागलेल्या तरुणाईला आवाहन केलं आहे.


