Electric Shock School Boy : कोल्हापूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळताना चेंडू शेजारच्या इमारतीवर गेल्याने तो आणण्यासाठी टेरेसवर गेलेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा ११ हजार व्होल्टच्या उच्चदाब वाहिनीला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. अफान असिफ बागवान (वय १३) असं मृत मुलाचं नाव आहे. शिक्षकांच्या संपामुळे शाळेला सुट्टी असल्याने तो मित्रांसोबत खेळत होता. ही घटना उजळाईवाडी (ता. करवीर) येथील बालाजी पार्क परिसरात शुक्रवारी (५ डिसेंबर) दुपारी घडली आहे.
नेमकं काय घडलं?
अफान हा इयत्ता सातवीत शिकत होता. सकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळताना चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या चारमजली इमारतीच्या टेरेसवर गेला. चेंडू आणण्यासाठी तो टेरेसवर गेला. मात्र, त्या इमारतीच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून कोल्हापूर विमानतळाला वीजपुरवठा करणारी ११,००० व्होल्टची उच्चदाब वाहिनी जात होती.
अफानचा हात किंवा शरीराचा भाग या तारेला लागताच प्रचंड विद्युत प्रवाहाचा धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. घटनेची चाहूल लागताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अफानचा मृत्यू झाला होता. गोकुळ शिरगाव पोलिसांनी याची नोंद केली असून, पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवला आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अफानचे वडील असिफ बागवान हे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरी करतात आणि पार्टटाईम रिक्षा चालवतात. आई गृहिणी असून, दोन लहान बहिणी आहेत. काबाडकष्ट करणाऱ्या या कुटुंबावर आता दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उच्चदाब वाहिनी घरांच्या इतक्या जवळून का नेली, याबाबत नागरिकांमध्ये संताप आहे.
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे चिंता
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत उच्चदाब वाहिनीच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. टेरेसवर कपडे वाळत घालताना, पतंग उडवताना किंवा चेंडू आणताना अशा घटना घडल्या आहेत. महावितरणकडून वाहिन्यांची उंची वाढवणे, इन्सुलेटेड वायर्स बसवणे आणि नागरिकांना जागृती करणे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अफानच्या जाण्याने बालाजी पार्क परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबाला धीर देण्यासाठी नागरिक आणि नातेवाईकांची रीघ लागली आहे.


