सोलापूर : मेडिकल दुकानातून घराकडे पायी चालत जात असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावरील ओढणी ओढून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून अविनाश पुंडलिक कांबळे (वय २४, रा. चिखर्डे, ता. बार्शी) विरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साधारण एप्रिल महिन्यात यातील पीडिता घराकडे पायी जात होती. त्यावेळी आरोपीने तिच्या मोबाईलवर फोन करून मला तुला भेटायचे आहे, असे बोलला. त्यावर पीडितेने काही संबंध नाही, असे म्हणून फोन बंद केला. घटनेनंतर काही वेळाने पीडिता मेडिकल दुकानात गोळ्या घेऊन घराकडे पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आरोपी तिथे आला. त्याने पीडितेची अंगावरील ओढणी ओढून त्याच्या जवळ असलेल्या बाटलीतील पाणी तिच्या अंगावर ओतले. यानंतर २६ जुलै रोजी दुपारी यातील पीडितेचा भाऊ हा शिकवणीकरिता जात होता, त्यावेळी यातील आरोपीने त्यास अडविले. त्यास शिवीगाळ करून तुझ्या बहिणीला भेटायला सांग, नाहीतर तुला ठार मारेन, अशी धमकी दिली. सदर गुन्हा पांगरी पोलीस स्टेशन येथे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.


