गोंदवले (सातारा): ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहिवडी पोलीस ठाण्यात तुषार खरात यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्याच प्रकरणातील चौकशीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अजित पवारांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांना दहिवडी पोलिसांनी प्रकरणात ताब्यात घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
खंडणी प्रकरणात तुषार खरात यांना दहिवडी पोलिसांनी मुंबईमधून ताब्यात घेतले होते. ज्या महिलेच्या अनुषंगाने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले गेले, त्या महिलेला देखील सातारा पोलिसांनी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सुभेदार यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. दरम्यान, अजित पवार हे दहिवडी कॉलेजच्या महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आहेत.


