Sangamner Election 2025: संगमनेर नगरपालिका निवडणूक 2025 ची तयारी जोरात सुरू झाली असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत थेट हस्तक्षेप करत सक्रिय भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले तांबे यांनी ‘संगमनेर नगरपालिका 2.0’ नावाने मोहीम राबवून शहराच्या भविष्यकालीन विकासाचा रोडमॅप तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या मोहिमेत नागरिकांकडून कल्पना गोळा करण्यासाठी QR कोडच्या माध्यमातून अभिप्राय मागवले जात असून या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
याच दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांचे नगराध्यक्ष पदासाठी नाव जोरदारपणे पुढे येऊ लागले आहे. तांबे काँग्रेसकडून निलंबित असल्याने, महाविकास आघाडीऐवजी ‘शहर विकास आघाडी’ या नव्या स्थानिक गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे या वेळी अधिकृत पक्षचिन्हाऐवजी स्वतंत्र चिन्हावर लढण्याची शक्यता प्रबळ आहे. बाळासाहेब थोरात यांच्याच नेतृत्वाखाली ही लढत होत असल्याने शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची भूमिका काय असेल, हे सध्या प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवावर शिक्कामोर्तब होत नाही, तर त्यातून शिकून पुढे आलो असल्याचे सत्यजित तांबे स्पष्ट सांगतात. या वेळी संघटनाची चूक सुधारली असून नगरपालिका निवडणुकीत नवी दमदार लढत देणार असल्याचा त्यांचा दावा आहे. तांबे दाम्पत्याची वाढलेली हालचाल आणि नव्याने निर्माण होत असलेले राजकीय वातावरण संगमनेरमधील निवडणूक आणखीच रंगतदार करणार हे निश्चित.
हेही वाचा – बिहारमध्ये NDA चा प्रचंड विजय! फडणवीसांनी केलेल्या प्रचाराने केली कमाल
दुसरीकडे, महायुतीही संगमनेरमध्ये एकसंध होण्याच्या तयारीत दिसत आहे. सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकत्र कार्यकर्ता मेळावा घेत महायुती एकत्रितपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. जनता आता परिवर्तनाची वाट पाहत असल्याचा विश्वास आमदार खताळ व्यक्त करतात. विधानसभेप्रमाणेच नगरपालिकेतही “धनशक्ती विरुद्ध जनशक्ती” अशी थेट लढत होणार असल्याचे ते म्हणाले.
दीर्घकाळ संगमनेर नगरपालिकेवर असलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व यंदाच्या निवडणुकीत टिकणार की महायुती आणि विखे पिता-पुत्रांमुळे सत्तेत उलथापालथ होणार? आगामी काही दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होणार असून संगमनेरची ही लढत अत्यंत रोचक बनली आहे.


