सोलापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाकडील काही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिली जातात. अशीच काही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता डोंगरेश चाबुकस्वार यांनाही देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिलेल्या वर्क ऑर्डरनुसार, दिलेल्या कामांपैकी दोन कामे चाबुकस्वार यांनी पूर्ण केली. त्यानंतर ते बिल मागायला गेले असता संबंधितांनी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत या वर्क ऑर्डरवरील सही माझी नसल्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हात वर केले. त्यामुळे चाबुकस्वार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
डोंगरेश चाबुकस्वार यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आतापर्यंत विविध प्रकारच्या ९ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यानसार त्यांनी आर्थिक अडचण असतानाही अनेकांकडून उसने पैसे घेऊन वेळप्रसंगी घरातील सोने गहाण ठेवून ही कामे पूर्ण केली. सहाय्यक अभियंता अजय वाघमारे, कनिष्ठ अभियंता राठोड यांनीच हे ९ कार्यारंभ आदेश दिले होते, असे त्यांचे म्हणणे आहे.


