Solapur Sangola Local body Election News : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असताना महायुतीतील शिंदेसेना आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने रात्री उशिरा छापा टाकला आहे. ही कारवाई पाटील यांच्या जाहीर सभेनंतर तात्काळ करण्यात आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कार्यालयाची संपूर्ण झाडाझडती तपासणी करण्यात आली. अधिकार्यांनी कार्यालयातील सर्व उपस्थितांना बाहेर जाण्यास मज्जाव केला, तर संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. पाटील यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवरही छापे पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. छापेमारीत काय सापडले किंवा जप्त करण्यात आले का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ही कारवाई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मागील काही दिवसांत शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर ‘कंबरडं मोडलं’ असा आरोप करत जोरदार टीका केली होती. सांगोल्यात भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पाटील यांच्याविरोधात आघाडी साधली होती. मंत्री जयकुमार गोरे यांनी पाटील यांच्या विरोधकांना एकत्र आणल्याने ते चांगलेच नाराज झाले.
या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात बोलणाऱ्या पाटील यांच्या कार्यालयावर छापा पडल्याने महायुतीतील फूट उघड होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शिंदेसेना-भाजप वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पाटील यांच्या कार्यालयाबाहेरील घटनास्थळी स्थानिक शिवसेनकांनी निषेध नोंदवला असून, प्रशासनाने पारदर्शक तपास करावा, अशी मागणी केली आहे.


