पंढरपूर: पंढरपुरातून चंद्रभागेच्या नदी पात्रात बुडून आज शनिवारी (दि. १९) सकाळी तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. सुनीता सपकाळ (वय 43) आणि संगीता सपकाळ (वय 40) अशी दोन मृतदेह सापडलेल्या महिलांची नावे आहेत. दोघीही भोकरदन तालुक्यातील आहेत आणि एक महिला अनोळखी असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे भाविकांना पाण्याचा अंदाज न येण्याने अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. मात्र, प्रशासनाने या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना न केल्यामुळे भाविकांचे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला शनिवारी सकाळी चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. नदीपात्रात स्नानास उतरलेल्या आपल्या सोबतच्या महिला भाविक बुडू लागल्यावर इतर महिलांनी आरडा ओरड करून मदतीसाठी आवाहन केले. मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्हीही महिला बुडाल्या .


