Iran US War Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव अखेर कमी झाला असून दोन्ही देशांनी दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीला सहमती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत लष्करी कारवाया तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय जाहीर केला.
याआधी अमेरिकेकडून इराणवर मोठ्या हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्या पार्श्वभूमीवर इराणने दिलेला प्रस्ताव स्वीकारत दोन्ही देशांमध्ये सशर्त युद्धविराम करण्यात आला आहे. या कालावधीत शांतता चर्चेला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
इराणकडून “हल्ले थांबले तर आम्हीही संघर्ष थांबवू” अशी भूमिका मांडण्यात आली, तर अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याची अट घातली होती. या अटीवरही सकारात्मक तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे.
या शस्त्रसंधीत पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करी नेतृत्वाच्या चर्चेनंतर हा निर्णय शक्य झाल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.
दरम्यान, इराणचे नेते मोजतबा खामनेई यांनी या शस्त्रसंधीला “इराणचा विजय” असे संबोधले आहे. अंतिम करारासाठी पुढील चर्चा लवकरच होण्याची शक्यता आहे. या युद्धविरामामुळे मध्य-पूर्वेत तणाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील दोन आठवडे निर्णायक ठरणार आहेत.


