Bihar Election Results: देशाच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरू झाली. पोस्टल मतपत्रिकांपासून सुरू झालेली ही प्रक्रिया लवकरच ईव्हीएम मतांच्या मोजणीकडे वळली. सुरुवातीचा पहिला तास वगळता जवळजवळ सर्वच वेळा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने स्पष्ट आघाडी कायम ठेवली. ताज्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये भाजप 84 आणि जेडीयू 78 जागांवर पुढे आहेत. दुसरीकडे, राजदला 32 आणि काँग्रेसला केवळ 7 जागांवर आघाडी मिळाली आहे. अशाप्रकारे 243 पैकी तब्बल 191 जागांवर एनडीए उमेदवार आघाडीवर असून, महागठबंधन फक्त 48 जागांवर लढा देताना दिसत आहे. त्यामुळे बिहारचा निकाल एकतर्फी लागण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का
या सर्व घडामोडींमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निराशाजनक कामगिरी. बिहार निवडणुकीत प्रथमच स्वतंत्रपणे 15 जागांवर उमेदवार उतारवणाऱ्या या पक्षाचे उमेदवार एकही ठिकाणी आघाडी घेऊ शकलेले नाहीत. सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीनुसार, 15 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत.
हेही वाचा – बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न…! बिहार विधानसभा निवडणूक निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
दरम्यान, त्याहून धक्कादायक बाब म्हणजे या उमेदवारांपैकी कुणालाही अद्याप 500 मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. ही स्थिती कायम राहिल्यास सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पक्षाचा राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्याचे अजित पवार यांचे प्रयत्न फोल ठरू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने वैभव आणि आजची स्थिती
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार झारखंड, गोवा, गुजरात, केरळ, नागालँड आणि मेघालयपर्यंत झाला होता. बिहारमध्ये तारिक अन्वर यांच्या उपस्थितीमुळे पक्षाला वजन मिळाले होते. परंतु पक्ष दोन गटात विभागल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमवावा लागला. हा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठीच अजित पवार यांनी बिहारमध्ये एनडीएपासून दूर जात स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले. मात्र सध्याच्या मतमोजणीतील कल पाहता हा निर्णय फसलेला दिसत आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची मतसंख्या
- नौटन – जय प्रकाश : 43 मते
- पिंप्रा – अमित कुमार कुशवाह : 370 मते
- मनिहारी – सैफ अली खान : 196 मते
- पारसा – बिपीन सिंह : 144 मते
- सोनेपूर – धर्मवीर कुमार : 25 मते
- महुआ – अखिलेश कुमार ठाकूर : 149 मते
- राघोपूर – अनिल सिंह : 147 मते
- बाखरी – विकास कुमार : 127 मते
- अमरपूर – अनिल कुमार सिंह : 52 मते
- पाटना साहिब – आदिल आफताब खान : 192 मते
- मोहानिया – मुन्ना कुमार : 80 मते
- सासाराम – आशुतोष सिंह : 21 मते
- दिनारा – मनोज कुमार सिंह : 53 मते
- नरकटियागंज – राशिद अझीम
- राजनगर – हरीलाल पासवान


