Nimesulide Ban: केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित एक अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. ताप आणि वेदना कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या ‘निमेसुलाइड’ या औषधाच्या 100 mg पेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर तातडीने बंदी घालण्यात आली आहे. या औषधामुळे यकृतावर (Liver) गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली.
बंदी घालण्याचे नेमके कारण काय?
‘ड्रग्ज टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्डा’ने (DTAB) केलेल्या सखोल तपासणीनंतर या औषधाच्या दुष्परिणामांवर शिक्कामोर्तब केले आहे. निमेसुलाइड हे औषध ‘नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी’ गटात येते. संशोधनानुसार, या औषधाचे अतिरिक्त डोस यकृताच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करून ते निकामी करू शकतात. या औषधातील घातक घटकांबाबत (Toxicity) केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाजारात वेदना कमी करण्यासाठी यापेक्षा अधिक सुरक्षित आणि प्रभावी औषधे उपलब्ध असताना रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या औषधाची विक्री थांबवणे गरजेचे असल्याचे सरकारने म्हटले आहे.
कायद्याचा बडगा
आरोग्य मंत्रालयाने ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, 1940’ च्या कलम 26A चा वापर करून ही बंदी लागू केली आहे. आता मेडिकल स्टोअर्स किंवा औषध विक्रेत्यांना या गोळ्यांची विक्री करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
तज्ज्ञांचा इशारा
केवळ यकृतच नाही, तर अतिप्रमाणात पेनकिलर्स घेतल्यास मूत्रपिंडावर (Kidney) देखील कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतेही औषध घेणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


