Petrol Diesel Price : अमेरिका आणि इराण यांच्यात जाहीर झालेल्या युद्धविरामानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया उमटली.
माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या दरात सुमारे १५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आली आहे. तसेच ‘वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट’ (WTI) क्रूडही सुमारे ९५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.
युद्धविरामामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीमधील वाहतूक पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा सुधारेल आणि तेलाच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात.
याचा थेट फायदा भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांना होणार असून पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून ऑइल टँकर्सची वाहतूक पुन्हा सुरू झाल्यास भारतातील इंधन तुटवडा कमी होऊन पुरवठा सुरळीत होईल.
तथापि, देशांतर्गत कर आणि इतर घटकांवरही इंधन दर अवलंबून असल्याने प्रत्यक्षात दर किती कमी होतात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.


