नवी दिल्ली: मुलासह बेपत्ता असलेल्या रशियन महिलेला शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लुकआऊट नोटीस जारी करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले आहेत. मुलाच्या ताब्यावरून रशियन महिला व तिच्या विभक्त राहत असलेल्या भारतीय पतीमध्ये मतभेद सुरू आहेत. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र व दिल्ली सरकारला महिला व मुलाला शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. बागची यांच्या खंडपीठासमोर या अनोख्या प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी झाली. खंडपीठाने यावेळी व्हिक्टोरिया नामक रशियन महिलेला कुठल्याही स्थितीत देश सोडणार नाही हे सुनिश्चित करण्यास सांगितले. आई आणि मुलाला शोधून काढा. यानंतर, मुलाला त्याचे भारतीय वडील सैकत बसू यांच्याकडे सोपवा, असे निर्देश खंडपीठाने दिले. आई मुलाला घेऊन जंगलात गायब झाल्याचे खंडपीठाला सांगण्यात आले. सुनावणीदरम्यान खंडपीठाने व्हिक्टोरियाच्या वकिलांना तिच्या पत्त्यावरून फटकारले. वकिलांनी व्हिक्टोरियाच्या पत्त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. यावर आमच्यासोबत खेळ खेळू नका? अशा शब्दांत खंडपीठाने वकिलांना सुनावले. तसेच जर रशियन दूतावासातील अधिकाऱ्यांनी व्हिक्टोरियाला देशाबाहेर जाण्यास मदत केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा दिला.
खंडपीठाने व्हिक्टोरियाचा पासपोर्ट जप्त करण्याचे आणि तिला शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत. तर, भारताची हेरगिरी करून व्हिक्टोरिया रशियाला परत जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा सैकत आणि त्यांच्या कुटुंबाचा संशय आहे. व्हिक्टोरिया २०१९ पासून एक्स-१ व्हिसावर भारतात राहत आहे.
चीनमध्ये सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला असताना सैकत बसू यांची व्हिक्टोरियासोबत भेट झाली. दोघांनी २०१७ मध्ये भारतात येऊन विवाह केला. वर्ष २०२० मध्ये या दाम्पत्याला एक मुलगादेखील झाला. पण, काही वर्षांत दाम्पत्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयात त्यांचे घटस्फोटाचे प्रकरणदेखील सुरू आहे. दरम्यान, मुलाच्या ताब्यावरून त्यांच्यात एक सहमती झाली होती. त्यानुसार २२ मे रोजी सैकत यांनी तीन दिवसांसाठी मुलाला व्हिक्टोरियाकडे दिले होते. यानंतरपासून ती मुलासह बेपत्ता असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


