बालाघाट, बिहार | बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत एक अनपेक्षित प्रसंग घडला. खगडिया जिल्ह्यातील परबत्ता मतदारसंघात आयोजित एनडीएच्या भव्य सभेदरम्यान फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान मंचावर बसत असतानाच, फडणवीस बसायला गेले आणि खुर्ची अचानक तुटली. क्षणभर व्यासपीठावर गोंधळ उडाला, पण सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आयोजकांनी नवीन खुर्च्या आणत कार्यक्रम पुन्हा सुरू केला. फडणवीस आणि पासवान यांनी हा प्रसंग हलक्याफुलक्या अंदाजात घेत उपस्थितांना अभिवादन केलं आणि आपली भाषणं सुरू ठेवली.
फडणवीस म्हणाले, “बिहारची जनता आता विकासाची अपेक्षा करते आणि एनडीएच ती दिशा देऊ शकते. महागठबंधनने केवळ भ्रष्टाचार आणि घराणेशाही वाढवली आहे.”
तर चिराग पासवान यांनी म्हटलं, “महागठबंधन म्हणजे सत्तेसाठीचं संधीसाधू एकत्रीकरण, जनतेच्या हिताशी त्यांना काही देणंघेणं नाही.” मंचावरील या छोट्याशा अपघातानंतरही सभेतील उत्साह कमी झाला नाही. हजारो कार्यकर्त्यांनी “एनडीए झिंदाबाद”च्या घोषणा देत वातावरण दणाणून टाकलं.
कार्यक्रमानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काहींनी यामागे आयोजकांच्या निष्काळजीपणाचा उल्लेख केला, तर काहींनी फडणवीसांच्या संयम आणि विनोदबुद्धीचं कौतुक केलं.


