अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांसाठी इराणवरील हल्ले थांबवले असले तरी, इराण माघार घ्यायला तयार नाही. मध्य-पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे. इराणने दावा केला आहे की, त्यांनी बुधवारी अमेरिकेच्या ‘अब्राहम लिंकन’ या युद्धनौकेवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. सरकारी टीव्हीवरून प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, इराणी लष्कराने अमेरिकेला इशारा दिला आहे की, जेव्हा हल्ला करणाऱ्या गटाची जहाजे टप्प्यात येतील, तेव्हा आणखी क्षेपणास्त्रे डागली जातील.
इराणच्या नौदलाच्या कादेर क्रूझ क्षेपणास्त्रांनी युएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू जहाजाला लक्ष्य केले, मार्ग बदलण्यास भाग पाडले,” असे इराणी लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात नौदल प्रमुख ॲडमिरल शहराम इराणी यांच्या हवाल्याने असेही म्हटले आहे की, विमानवाहू जहाजांच्या गटाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि शत्रूचा ताफा त्यांच्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या टप्प्यात येताच इराणी नौदल जोरदार हल्ला करेल.
या आघी इराणी नौसेनेने अमेरिकेला इशारा दिला होता. ‘अमेरिकन अब्राहम लिंकन सतत निगराणीखाली आहे आणि जर ती इराणच्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या टप्प्यात आली तर नौदलाकडून तिला लक्ष्य केले जाईल, असेही यामध्ये म्हटले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली
तेहरानमधील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी अमेरिकेचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर नाकारल्यानंतर हा नौदल इशारा देण्यात आला आहे. त्यांनी वॉशिंग्टनच्या काही दिवसापूर्वी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांना केवळ देखावा असल्याचे म्हटले आहे. प्रेस टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झोल्फघारी यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिकेने पूर्वी दाखवलेली सामरिक शक्ती आता एक डावपेचात्मक पराभव ठरली आहे.


