नवी दिल्ली: सध्या देशात मतचोरीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात आज विरोधी पक्षाचे खासदार संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी खासदारांच्या मोर्चाला निवडणूक आयोगाकडे जाऊ दिले नाही. असे असूनही, विरोधी पक्षाचे खासदार मोर्चा काढत होते, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
त्याचवेळी निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बॅरिकेडिंग करून मोर्चा थांबवण्यात आला. अनेक खासदार बॅरिकेडवर चढले आणि उड्या मारल्या. अखिलेश यादव बॅरिकेडवरून उडी मारली. टीएमसी खासदार सागरिका घोष आणि महुआ मोईत्रा या देखील बॅरिकेडवर चढल्या. नंतर अखिलेश यादव धरणे आंदोलनावर बसले. ते म्हणाले की, पोलिस आम्हाला रोखत आहेत.
राहुल गांधी म्हणाले, ‘वास्तविकता अशी आहे की, ते बोलू शकत नाहीत. सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही. ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. ही लढाई एका व्यक्तीची, एका मताची आहे. आम्हाला स्वच्छ मतदार यादी हवी आहे.’ दरम्यान, प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘हे लोक घाबरले आहेत. सरकार भित्रे आहे.’
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या ३० सदस्यीय शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले होते. निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता ३० जणांना भेटण्यासाठी बोलावले होते. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी १२:०० वाजता चर्चेसाठी वेळ दिला. जागेच्या कमतरतेमुळे जास्तीत जास्त ३० जणांची नावे कळवावीत अशी विनंती केली होती. यावर विरोधक म्हणाले की, एकतर सर्वजण निवडणूक आयोगाकडे जातील किंवा कोणीही जाणार नाही. आम्ही शिष्टमंडळाला भेटण्यासाठी नाही, तर एकत्रितपणे निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला होता.
मतदार यादीवरून वाद सुरूच
मतदार यादीतील अनियमिततेवरून सुरू असलेली लढाई सुरूच आहे. राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षनेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी काल यासंदर्भात एक मोहीमही सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल गांधी यांनी एक वेबसाईटही सुरू केली आहे. यासोबतच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केले आहे.


