Rajasthan Jaisalmer AC bus fire : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मंगळवारी सायंकाळी धावत्या खासगी एसी स्लीपर बसला अचानक आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अग्नितांडवात आतापर्यंत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, १६ जण गंभीररीत्या भाजले आहेत. मृतांमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश असल्याने ही घटना अधिक हृदयद्रावक ठरली आहे. जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, पण तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. प्राथमिक तपासानुसार, एसी युनिटमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतरही बस काही किलोमीटरपर्यंत धावत राहिली, ज्यामुळे प्रवाशांच्या आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले. काही प्रवाशांनी खिडक्यांमधून उडी मारून प्राण वाचवले, तर इतर अडकून पडले.
गंभीर जखमींना प्रथम जैसलमेरच्या जवाहर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून प्राथमिक उपचारानंतर जोधपूरला हलवण्यात आले. जखमींमध्ये महिपाल सिंग, ओमाराम, युनूस, मनोज भाटिया, इक्बाल, फिरोज, भागा बाई, पीर मोहम्मद, जीवराज, हुसेन, इमामत, विशाखा, आशिष, रफिक, लक्ष्मण आणि उबेदुल्ला यांचा समावेश आहे. बहुतेक जखमी ५० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त भाजले असल्याची माहिती आहे.
या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त केला असून, मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना सरकारी मदतची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असून, काही वर्षांपूर्वी नाशिकमधील बस अग्निदुर्घटनेच्या आठवणींनी लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अधिकृत तपास सुरू असून, कारण स्पष्ट होईपर्यंत वाहन तपासणीची प्रक्रिया कडक करण्याची मागणी होत आहे.


