Watermelon Death: मध्य प्रदेशातील श्योपूर येथे कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच बाप-लेकाची प्रकृती बिघडली. यामध्ये ४३ वर्षीय पित्याचा मृत्यू झाला असून, २१ वर्षीय मुलगा सध्या रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत घडलेल्या अशाच एका घटनेची यामुळे पुन्हा एकदा आठवण झाली आहे.
नेमका काय घडला प्रकार?
इंद्रसिंग परमार आणि त्यांचा मुलगा विनोद या दोघांनाही गुरुवारी रात्रीपासून छातीत जळजळ जाणवत होती. उन्हाळ्यामुळे हा त्रास होत असावा, असा अंदाज बांधून त्यांनी शुक्रवारी सकाळी बाजारातून कलिंगड विकत आणले. पोटातील उष्णता कमी होईल या आशेने दोघांनी कलिंगड खाल्ले, परंतु काही वेळातच त्यांना तीव्र अस्वस्थता आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला.
वाटेतच संपली साथ
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबीयांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी प्रकृतीचे गांभीर्य ओळखून त्यांना राजस्थानमधील कोटा येथे नेण्याचा सल्ला दिला. मात्र, दुर्दैवाने कोटा येथे पोहोचण्यापूर्वीच इंद्रसिंग यांची प्राणज्योत मालवली. मुलगा विनोद याला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
हा घात कशामुळे? डॉक्टरांचा मोठा संशय
कलिंगड खाल्ल्यामुळेच मृत्यू झाला की यामागे दुसरे काही कारण आहे, याबाबत आता वैद्यकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. डॉक्टरांच्या मते, केवळ फळ खाल्ल्याने इतकी तीव्र प्रतिक्रिया येणे कठीण आहे. हा प्रकार गंभीर ‘अन्नबाधा’ (Food Poisoning) किंवा एखाद्या विषारी संसर्गामुळे झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात फळ खरेदी करताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


