Monsoon Rain : भीषण उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने भारतात अधिकृतरीत्या प्रवेश केला असून तो अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने सांगितले की, अंदमान परिसरात सध्या ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडील वारे वाहत आहेत. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील परिस्थितीही मान्सूनसाठी अनुकूल असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
यंदा मान्सून केरळातही नेहमीपेक्षा लवकर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. साधारणपणे १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा २६ मेच्या आसपास किनारपट्टीवर धडक देऊ शकतो. बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या हालचालींना वेग मिळाला आहे.
विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा येण्याची शक्यता कमी असून तो सुरळीतपणे पुढे सरकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून ५ जूनपर्यंत गोव्यात दाखल होऊ शकतो, तर ६ जूनपर्यंत कोकणात आणि ७ जूनपर्यंत पुण्यात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटकमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.


