Russia-Ukraine war: एकीकडे युद्धाच्या समाप्तीसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये शांतता चर्चा सुरू असतानाच, रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. रशियाने रात्रभरात ३७० हून अधिक ड्रोन आणि २१ क्षेपणास्त्रे डागून युक्रेनची राजधानी कीव आणि खारकीव शहरांना लक्ष्य केले. या भीषण हल्ल्यामुळे युक्रेनमधील ऊर्जा यंत्रणा कोलमडली असून तब्बल ९० टक्के भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
अबू धाबी येथे रशिया, युक्रेन आणि अमेरिकेचे प्रतिनिधी चार वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी दुसऱ्या दिवसाच्या चर्चेसाठी एकत्र आले होते. मात्र, याच काळात रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्रीय सिबिगा यांनी टीका करताना म्हटले की, “पुतिन यांनी केवळ आमच्या शहरांवरच नाही, तर शांतता वाटाघाटीच्या टेबलावरच क्षेपणास्त्रे डागली आहेत. ही रशियाची क्रूरता आणि शांतता प्रक्रियेला कमकुवत करण्याची चाल आहे.”
मुख्य शहरे ठरली लक्ष्य; जनजीवन विस्कळीत:
कीव आणि खारकीव: रशियन हल्ल्याचा मुख्य केंद्रबिंदू राजधानी कीव आणि दुसरे मोठे शहर खारकीव होते. कीवमधील अनेक जिल्ह्यांत ड्रोन हल्ल्यांमुळे भीषण आग लागली.
अंधारात बुडाले युक्रेन: ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केल्यामुळे युक्रेनमधील सुमारे ८८,००० हून अधिक कुटुंबांना तात्काळ वीज कपातीचा सामना करावा लागला. कडाक्याच्या थंडीत लाखो नागरिक अंधारात असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी या हल्ल्याचा निषेध करताना सांगितले की, “गेल्या काही आठवड्यांतील हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. यावरून रशियाची युद्ध थांबवण्याची कोणतीही मानसिकता नसल्याचे स्पष्ट होत आहे.”
दरम्यान, युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमेरोव अबू धाबीत चर्चेसाठी उपस्थित आहेत, मात्र डोनबास प्रदेशातील सीमावादावर अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.
तिसऱ्या महायुद्धाची भीती?
रशियाने चर्चेच्या दरम्यानच इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाटो (NATO) आणि पाश्चात्य देश यावर काय भूमिका घेतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. रशियाची ही आक्रमकता शांतता प्रक्रियेला पूर्णपणे खिळ घालणारी ठरल्यास युद्धाचा भडका अधिक उडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


