पारनेर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाला असून, त्यानंतर राज्यात पक्षांतरांच्या मालिकेला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायुतीत प्रवेश करून राजकीय वातावरण तापवले होते. आता मात्र महायुतीतीलच काही नेते आपापल्या सहयोगी पक्षांकडे वळताना दिसत आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यावर होत आहे.
पारनेरमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक मोठा राजकीय उलटफेर झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. झावरे कुटुंबीयांचा या भागात मजबूत प्रभाव असून, दिवंगत वसंतराव झावरे हे पारनेरचे माजी आमदार राहिलेले आहेत.
हेही वाचा – मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवार अडचणीत; चौकशी समितीकडून तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं निलंबन
शब्द न पाळल्याने पक्ष सोडला – सुजित झावरे
शिवसेनेत प्रवेश करताना झावरे यांनी उघडपणे सांगितले की, अजित पवार यांच्या पक्षात आम्हाला डावलण्यात आले. दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनी विकासाचे आश्वासन दिले, म्हणून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गटातील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचं दिसत आहे.
झावरे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला पारनेर आणि आसपासच्या भागात मोठी राजकीय ताकद मिळाल्याचं म्हटलं जात आहे. तर, अजित पवार गटासाठी हा धक्का ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनस्तापदायक ठरू शकतो. राज्याच्या इतर भागांतही अशा पक्षांतरांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


