Eknath Shinde On Prithviraj Chavan: काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘एपस्टीन फाईल्स’ संदर्भात केलेल्या विधानावरून राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या या आरोपांचा खरपूस समाचार घेत, “हे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे,” अशा प्रखर शब्दांत त्यांनी पलटवार केला. पुण्याचे माजी उपमहापौर उल्हास बागुल यांच्या शिवसेना प्रवेशावेळी शिंदे बोलत होते.
पोटदुखी आणि जळजळ; चव्हाणांच्या टीकेला उत्तर
पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आरोपांना शिंदेंनी ‘केविलवाणा प्रयत्न’ म्हटले आहे. जेव्हा एखादा नेता राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित होतो, तेव्हा चर्चेत येण्यासाठी असे सनसनाटी दावे केले जातात, अशी टीका शिंदेंनी केली. भारत आज जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून 3 व्या क्रमांकाकडे वेगाने वाटचाल करत आहे. ही प्रगती पाहून विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
विसंगत दाव्यांवरून ओढले ताशेरे
शिंदेंनी पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानांमधील गोंधळ अधोरेखित केला. “आधी चव्हाण म्हणत होते की 19 डिसेंबरला पंतप्रधान बदलतील, आता ते एपस्टीन फाईल्सचे नवीन तुणतुणे वाजवत आहेत. त्यांच्याकडे जनतेला सांगण्यासारखे ठोस काहीही उरलेले नाही,” असे शिंदे म्हणाले. केवळ चव्हाणच नव्हे, तर राहुल गांधी यांच्यावरही यावेळी शिंदेंनी निशाणा साधला. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात आणि लष्कराच्या शौर्यावर शंका घेतात. त्यांचे पाकिस्तान प्रेम उघड झाले असून, हा देशाशी केलेला द्रोह आहे, असा घणाघात शिंदेंनी केला.
पुण्यात काँग्रेसला खिंडार
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. ज्येष्ठ नेते आबा ऊर्फ उल्हास बागुल यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला. विकसित भारताच्या संकल्पात सहभागी होण्यासाठी अनेक नेते आमच्यासोबत येत असल्याचे सांगत शिंदेंनी आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले.


