Pune Politics: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुण्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये विशेषतः अजित पवार गट आणि ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.
आमदारांच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश
सर्वात जास्त चर्चा रंगली ती वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे (शरद पवार गट) यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशाची. विशेष म्हणजे, बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेसाठी भाजप सोडली असली, तरी पठारे कुटुंबाचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध सर्वश्रुत आहेत. सुरेंद्र पठारे यांनी पुन्हा भाजपची वाट धरल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या अजित पवार गटाला भाजपने मोठा धक्का दिला आहे. माजी महापौरांच्या मुलासह अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी कमळ हाती घेतले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख नेते
अजित पवार गट: उषा वाघेरे, प्रभाकर वाघेरे, प्रशांत शितोळे, राजू मिसाळ, समीर मासुळकर, जालिंदर शिंदे, प्रसाद शेट्टी, विनोद नढे.
ठाकरे गट: संजोग वाघेरे (शहराध्यक्ष), रवी लांडगे, अमित गावडे, मीनल यादव.
इतर: नवनाथ जगताप (शरद पवार गट), कुशाग्र कदम (मंगला कदम यांचे पुत्र), संजय काटे (अपक्ष).
पुणे शहरातूनही ‘इनकमिंग’
पुणे महापालिकेतील अनुभवी माजी नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात विकास दांगट, सायली वांजळे आणि बाळा धनकवडे यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रवेशांमुळे पुणे शहरात भाजपची तटबंदी अधिक मजबूत झाली आहे.
भाजपमधील निष्ठवंतांचे ‘बंड’
एककीकडे मोठ्या नेत्यांचे स्वागत होत असतानाच, पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बाहेरच्यांना पक्षात घेणार होतात, तर मग आमच्या मुलाखती कशाला घेतल्या? असा सवाल करत इच्छुकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या नवीन नेत्यांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा निष्ठवंतांनी दिला आहे.


