T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची प्राथमिक घोषणा करण्यात आली असून, यंदा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. विद्यमान विजेत्या भारतीय संघावर यावेळी जेतेपदाचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या संघाचा भाग असलेले सूर्यकुमार यादव यांच्याकडे यंदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे.
टीम इंडियाचा प्राथमिक संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन.
हेही वाचा –अनकॅप्ड खेळाडूंना आयपीएल लिलावात अधिक मागणी कशामुळे ?
सूर्यकुमार यादववर नेतृत्वाची मोठी जबाबदारी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून इतिहास घडवला होता. त्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यामुळे सूर्यकुमार यादवला टी-२० संघाचे नेतृत्व देण्यात आले. सूर्यकुमारच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केली असून, अद्याप एकही द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. त्यामुळे आगामी विश्वचषकात त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे, टी-२० विश्वचषक यजमान देशाने आजपर्यंत कधीही जेतेपद पटकावलेले नाही. त्यामुळे यंदा भारताला इतिहास रचण्याची संधी मिळाली आहे.
गट अ मध्ये भारत, पाकिस्तानही समाविष्ट
टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारताला गट अ मध्ये स्थान देण्यात आले असून, या गटात अमेरिका, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि नामिबिया यांचा समावेश आहे.
भारतीय संघाचे गटातील सामने पुढीलप्रमाणे असतील –
७ फेब्रुवारी : भारत विरुद्ध अमेरिका
१२ फेब्रुवारी : भारत विरुद्ध नामिबिया
१५ फेब्रुवारी : भारत विरुद्ध पाकिस्तान (अतिशय चुरशीचा सामना)
१८ फेब्रुवारी : भारत विरुद्ध नेदरलँड्स
भारत–पाकिस्तान सामना हा नेहमीप्रमाणेच स्पर्धेतील सर्वात मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. एकूणच, संतुलित संघरचना आणि अनुभवी नेतृत्वाच्या जोरावर टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वविजेतेपद राखण्यात यशस्वी ठरेल का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.


