अष्टपैलू: आयपीएलचा हंगाम कुठलाही असला, तरी त्यापूर्वी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावाची अधिक चर्चा होते. खेळाडूंना खरेदी करताना फ्रॅंचाइजीच्या वतीने लावल्या जाणाऱ्या बोलींमध्ये तीव्र स्पर्धा दिसून येते. प्रत्येक हंगामात ही स्पर्धा अधिक तीव्र होत आल्याचे आपण पाहिले आहे. या वेळी पार पडलेल्या लिलावात राष्ट्रीय संघात स्थान मिळालेल्या अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी करण्याचा कल अधिक दिसून आला. यामुळे भारतीय संघाकडून खेळण्याची संधी हुकल्यानंतरही या खेळाडूंना आपली कामगिरी दाखविण्यासाठी एक चांगले व्यासपीठ यामुळे मिळते आणि भविष्यात त्यांना राष्ट्रीय संघाचे दरवाजे खुले होतात. आयपीएलच्या माध्यमातून राष्ट्रीय संघापर्यंत पोहचणाऱ्या खेळाडूंची यादी नक्कीच मोठी आहे. या वेळी चेन्नई सुपर किंग्ज सारख्या तगड्या संघाने प्रतिष्ठित खेळाडूंऐवजी प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी करताना विक्रमी १४.२० कोटी रुपयाची बोली लावली.
अनकॅप्ड खेळाडूंची अलिकडची देशंतर्गत स्पर्धांमधील दमदार कामगिरी आणि टी २० क्रिकेटसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट कौशल्याशी त्यांची असलेली जवळीक, त्यांचे कमी वय याबरोबरच संघाच्या वेतन मर्यादेत येत असलेल्या लचिकतेमुळे फ्रॅंचाइजी मालक आणि त्यांचे तज्ज्ञ अशा खेळाडूंकडे अधिक लक्ष पुरवत आहेत असाच संदेश या लिलावातून मिळाला आहे.
देशांतर्गत कामगिरी
बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली टी २० स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवून देण्याची संधी मिळते. देशांतर्गत स्पर्धा कार्यक्रमात रणजी करंडक, विजय हजारे करंडक अशा स्पर्धा होत असल्या तरी मुश्ताक अली स्पर्धेचे वलय अधिक वाढू लागले आहे. आयपीएलची वाढती लोकप्रियता हे याचे मुख्य कारण आहे. चार दिवसांच्या क्रिकेटमध्ये खेळाडूंना विचार करण्यास वाव असतो, हाच वाव एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका पातळीपर्यंत कायम राहतो. पण, टी २० सारख्या लघुत्तम क्रिकेट पद्धतीत विचार करण्यास किंवा चुका करण्यास वावच नसतो. आपले नाणे खणखणीतच वाजवावे लागले. फलंदाजांना धावगती राखण्यासाठी जागरुक असावे लागते. एखादा निर्धाव चेंडू देखिल महागात ठरु शकतो. तसेच गोलंदाजांच्या हातात केवळ चारच षटके असतात. या चार षटकांतच त्यांना आपले कौशल्य पणाला लावायचे असते. त्यामुळे टी २० क्रिकेट लघुत्तम असले, तरी सर्वाधिक वेगवान आहे. या सगळ्याचा अभ्यास आता क्रिकेटपटू सुरुवातीपासून करु लागले आहेत. त्यामुळेच क्रिकेटपटू फ्रॅंचाइजी मालक आणि त्यांच्या व्यवस्थापनाला आकर्षण करण्यासाठी देशांतर्गत स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावतात आणि त्याचे परिणाम लिलावात दिसून येतात. जे या वेळी प्रकर्षाने जाणवले.
विशिष्ट कौशल्य
या आधी म्हटल्याप्रमाणे अलिकडे क्रिकेटपटू बदलत्या प्रवाहाशी झटपट जुळवून घेऊ लागले आहेत. टी २० सारख्या लघुत्तम आणि वेगवान क्रिकेट पद्धतीत आवश्यक असलेली आक्रमकता, ताकदवान फटके मारण्याची आणि अधिक वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता क्रिकेटपटू सिद्ध करत आहेत. अखेरच्या पाच एक षटकांमधील म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेत डेथ ओव्हर्समधील कामगिरी कायम निर्णायक ठरत असते. फलंदाज किंवा गोलंदाज आपल्या कुवतीनुसार स्लवतःला खास या अखेरच्या क्षणासाठी विशेष प्रयत्न करु लागले आहेत. सहाजिकच अशा खेळाडूंकडे खरेदीदारांचा कल वाढत आहे.
भविष्याची गुंतवणूक
अनकॅप्ड खेळाडूंकडे अधिक लक्ष जाण्याचे कारण म्हणजे क्रिकेट विश्वावर आपली छाप पाडणारे खेळाडू आता वाढत्या वयामुळे निवृत्तीच्या वाटेवर आले आहेत. क्रिकेटच्या व्यग्र कार्यक्रमामुळे त्यांच्या खेळावर देखिल कमी अधिक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिष्ठित खेळाडूंवर विश्वास दाखवतानाचल त्यांच्या साथीला युवा खेळाडूंची जोड देऊन फ्रॅंचाइजी मालक आपला भविष्यातील संघ बांधण्याचा विचार करु लागले आहेत. अनकॅप्ड खेळाडूंवर केलेली गुंतवणूक त्यांच्यासाठी दीर्घकालीन ठरु शकते.
खर्चामधील लवचिकता
आयपीएलचा लिलाव म्हटले की पहिली चर्चा कोणता खेळाडू किती महागडा ठरला याची होते. बीसीसीआय आणि आयपीएलने फ्रॅंचाइजी मालकांवर खर्चाचे ठराविक बंधन घातले आहे. त्या ठरवून दिलेल्या खर्चातच त्यांना आपला संघ तयार करायचा असतो. त्यामुळे अशा वेळी फ्रॅंचाइजी प्रतिष्ठित आणि अनकॅप्ड खेळाडू यांच्या व्यवहारात समतोल साधून आपल्या खर्चात लवचिकत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आधीच कमी मूळ किंमत असलेल्या अनकॅप्ड असलेल्या खेळाडूंची किंमत लिलावाच्या स्पर्धेत वाढली, तरी त्यांच्या खर्चावर फारसा परिणाम होत नाही.
दुसरे महत्वाचे कारण म्हणजे कॅप्ड आणि परदेशी खेळाडूंच्या संख्येवर देखिल बंधने आहेत. त्यांचे समीकरण जुळवण्यासाठी फ्रॅंचाइजी अशा अनकॅप्ड खेळाडूंचा पर्याय म्हणून विचार करतात.
आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे अशा अनकॅप्ड खेळाडूंमध्ये असलेली निर्भिड मानसिकता निर्णायक ठरते. प्रतिष्ठित खेळाडूंविषयी त्यांच्या कामगिरीमुळे अपेक्षा वाढलेल्या असतात. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे असते. मात्र, अनकॅप्ड खेळाडूंवर असे दडपण नसते. एखाद्या निर्णायक क्षणी त्यांची निर्भिडता महत्वाची ठरते. यामुळे देखिल अनकॅप्ड खेळाडूंकडे जाण्याचा कल वाढत आहे.
अनकॅप्ड खेळाडूंच्या खरेदीबाबत आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेले प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांची प्रतिक्रिया बोलकी ठरते. ते म्हणतात, “स्थानिक खेळाडूंना संघात घेतले, तर दुसरी फळी भक्कम होण्यासाठी आमच्याकडे पर्याय उभे राहतात. कधीकधी तुम्हाला खेळाडूंमध्ये वेळ आणि पैसा दोन्ही गुंतवावा लागतो. अनकॅप्ड खेळाडूंची निवड याच दृष्टिकोनातून केली गेली. या खेळाडूंचा आम्ही अभ्यास करतो. त्यांच्या कामगिरीकडे लक्षव ठेवून असतो. भविष्यात त्यांना अधिक परिपक्व करण्यासाठी आम्ही अशा खेळाडूंना संधी देतो.”


