Ajit Pawar Meet Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक साधारण नसून, ती त्यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावावर असलेल्या कथित जमीन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीवर कोट्यवधींच्या जमिनीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, अंजली दमानिया, अंबादास दानवे, आणि एकनाथ खडसे यांच्यासह विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांनी फडणवीसांची भेट घेणे हे राज्याच्या राजकीय समीकरणात नवा ट्विस्ट आणणारे ठरू शकते.
भेटीमागचं नेमकं कारण काय?
अजित पवार यांनी गुरुवारी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सार्वजनिकरित्या केली होती. त्यांनी स्पष्ट केलं होतं की, या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही. सर्व तपास झाला पाहिजे. तथापि, विरोधकांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे की, पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांच्या माहितीशिवाय ३ कोटींच्या व्यवहाराचा स्टॅम्प ड्युटी फक्त ५०० रुपये कशी भरली गेली? या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट केवळ औपचारिक नसून, पुढील राजकीय घडामोडींचा संकेत मानला जात आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
शिवसेना (ठाकरे गट) चे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की, १८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार पार्थ पवार यांच्या कंपनीने फक्त ३०० कोटींमध्ये केला. त्यातही, कंपनीचं भांडवल केवळ एक लाख रुपये असूनसुद्धा कोरेगाव पार्क परिसरात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी सुरू होती. आश्चर्य म्हणजे, उद्योग संचालनालयाने फक्त ४८ तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली, आणि २७ दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाला, असा आरोपही दानवेंनी केला.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, विरोधक अजित पवारांना लक्ष्य करत आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी, आगामी काही दिवसांत या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


