Uddhav Thackeray Meets Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठे बदल घडवू शकणारी महत्त्वपूर्ण घडामोड आज समोर आली. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी भेट देत अचानक राजकीय वातावरण तापवले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट साधीसुधी नसून दूरगामी परिणाम घडवू शकणारी असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. दोन्ही नेते स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा घोष करीत असताना, उद्धव ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरेंकडे जाऊन बोलणी केल्याने संभाव्य युतीबाबतच्या सूचनांना मोठे बळ मिळाले आहे. ही भेट केवळ औपचारिक ‘कौटुंबिक’ भेट नसून, निवडणुकीसंदर्भातील गंभीर चर्चेसाठी झाली असावी, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.
महापालिका निवडणुकांपूर्वी जागावाटपाची चर्चा?
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक स्तरावरील चर्चा झाल्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी ही बैठक महत्वाची असल्याचे समजते. सत्तासंघर्षाने तापलेल्या राज्यातील वातावरणात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याने विरोधकांमध्येही खळबळ उडाली आहे.
विशेष बाब म्हणजे या बैठकीत दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतील नेत्यांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे ही चर्चा अत्यंत गोपनीय स्वरूपाची असल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची कुजबुज सुरू असली तरी दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र अशी युती झाली, तर महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार यात शंका नाही.
शिवतीर्थकडे सर्वांचे लक्ष
या निर्णायक भेटीनंतर पुढील काही दिवसांत दोन्ही पक्ष काय भूमिका मांडतात, याकडे राज्याचे राजकारण डोळे लावून बसले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज्यातील सत्ता समीकरण, महापालिका निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकांवर मोठे परिणाम दिसू शकतात.


