पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात अनेक फेरबदल झाले. प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांची उचलबांगडी केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.त्यांनी नव्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला असताना आता पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे पक्षाला रामराम करून भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोण आहेत संग्राम थोपटे?
संग्राम थोपटे यांना ऐन तरुण वयातच विधानसभेवर जाता आलं. त्यामुळे दिग्गज नेत्यांची भाषणं, त्यांचा अभ्यास आणि कामाची पद्धत पाहून थोपटे यांची जडणघडण झाली. पुण्यातील भोर हा संग्राम थोपटे यांचा विधानसभा मतदारसंघ. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना भोर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी पक्षातील सक्रियता कमी केली होती आता थोपटे यांच्या संभाव्य भाजप पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीएपर्यंत शिक्षण घेतलेले संग्राम थोपटे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. भोरमध्ये गेल्या चार दशकांपासून थोपटे पितापुत्रांची सत्ता होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे संग्राम थोपटे हे पुत्र असून भोर तालुक्यात त्यांचा ठसा आहे.सलग तीनवेळा ते पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना मंत्री होऊ असं वाटत होतं. तशी कबुलीही त्यांनी दिली होती. तीन वेळा आमदार झाल्याने मंत्रिपदाची इच्छा होती, मात्र त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली. दरम्यान आता काँग्रेसची साथ सोडत ते भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपा प्रवेशासंदर्भात संग्राम थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे.


