पुणे: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या १४ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे या सफाई कर्मचान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून निधी न मिळाल्याने वेतन रखडल्याचे दिसून येत आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन कधी होणार आहे, याविषयी काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे सफाई कर्मचारी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातील १०५ सफाई कर्मचाऱ्यांना वेतन मिळवावे, याकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आआंदोलन केले.
गेल्या १४ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे, या कर्मचाऱ्यांचे वेतन कंत्राटदारांकडून केले जाते. मात्र, कंत्राटदारांनी वेतन दिले नाही, असे सफाई कर्मचान्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचीही भेट घेतली. मात्र ठोस उत्तर मिळाली नाही. त्यामुळे वेतन तत्काळ मिळावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, काही कंत्राटदारांना जिल्हा परिषदेकडून निधी मिळाला आहे. त्यातून तीन महिन्यांचे वेतन काही कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. परंतु या वेतनासाठी शासनाकडून निधी मिळाले नाही. त्यामुळे वेतन थकले आहे. अनुदान मिळताच सर्व कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


