मुंबई : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेवरील सद्यस्थितीचा अहवाल आणि त्यावरील निर्णय लवकरच दिला जाईल, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी परिषदेत शिवसेनेला (ठाकरे) दिली. शिवसेना (ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेसंर्भातील सद्यस्थिती काय आहे, अशी विचारणा केली.
सरन्यायाधीश भूषण गवई विधिमंडळाच्या सभागृहात येत असून, त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आहे. दुसरीकडे एका स्तंभाच्या प्रमुखांचे महाराष्ट्र शासन अभिनंदन करत असून, आमच्यासाठी गौरवशाली, ऐतिहासिक आणि सुवर्णक्षण आहे. दुसरीकडे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास नव्हे, तर अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली आहे. गेली अडीच वर्षे यावर सुनावणी सुरू आहे. नियमाप्रमाणे ९० दिवसांत त्यावर निकाल अपेक्षित होता. परंतु, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे सद्यस्थिती त्याची काय आहे, असा सवाल परब यांनी केला.


