Rupali Chakankar: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दोन दिवस टीकेची झोड उठल्यानंतर अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. शुक्रवारी (दि. २० मार्च) सायंकाळी चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून आपला राजीनामा सुपूर्द केला.
अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा अशोक खरातवर महिला अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजत आहे. यासंबंधीचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काही वेळापूर्वी केलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे.
दरम्यान हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी भोंदूबाबा खरातच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावर केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते, “शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत.कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही.”
मी त्यांना गुरू मानलं होतं – चाकणकर
दरम्यान राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना चाकणकर म्हणाल्या, “शिवनिका संस्थानात मी सदस्य म्हणून काम केले आहे. माझ्यासह अनेक मान्यवर देखील त्या संस्थेवर सदस्य होते. मात्र, या संस्थानच्या सदस्यपदाचा माझा कार्यकाळ ८ ऑगस्ट २०२५ रोजीच संपलेला आहे. समाजात जीवन जगत असताना आपण कोणाला ना कोणाला गुरू मानत असतो. खरात पती-पत्नीला माझ्या कुटुंबाने गुरु मानले, मीही गुरु मानले. त्या ठिकाणी होणारे कार्यक्रम, मग ते महाशिवरात्रीचे असतील किंवा गुरुपौर्णिमेचे असतील, या निमित्ताने आम्ही उपस्थित राहत होतो.”
मला सॉफ्ट टार्गेट केले – चाकणकर
“आम्ही संस्थांनाशी जोडलेलो होतो. याबाबत मीच ट्वीट करून सांगितले. ते फोटो माझे असून अनेक वर्षांपूर्वीचे होते. अनेक लोकांचे फोटो अशोक खरातबरोबर आहेत. पण महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केले गेले”, असेही रूपाली चाकणकर म्हणाल्या.
अशोक खरातवर तीन गुन्हे दाखल
अशोक खरात याच्यावर महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी खरात याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसची तपासणी केली असता एक पिस्तूल, काही संशयास्पद कागदपत्रे, काडतुसे सापडले आहेत. खरातविरुद्ध सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात अश्लील चित्रफित समाज माध्यमात टाकण्याची धमकी आणि पाच कोटींची खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरुन तसेच शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील छायाचित्र समाज माध्यमात टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे अशोक खरात?
सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी हे अशोक खरातचे मूळ गाव. खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. तो स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेतो. खरातने अंकगणित तसेच ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) चे शिक्षण घेतले असून मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर खरातने वावीजवळील मिरगाव शिवारातील शेतीत श्री शिवनिका संस्थान अंतर्गत ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केली.


