Ashok Kharat Case: नाशिकमधील स्वयंघोषित गुरु अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करणाऱ्या ‘खबरदार पुढारी’ या वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनर यांनी आता खळबळजनक दावा केला आहे. खरातसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असला, तरी हे प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षभरापासून जोरदार प्रयत्न केल्याचे खेमनर यांनी म्हटले आहे. “आम्ही केवळ सत्य जनतेसमोर आणले, पण आता या प्रकरणातील गुंड आणि राजकीय हस्तकांमुळे माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे,” अशी भीती व्यक्त करत खेमनर यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
वृत्तपत्र बंद करण्यासाठी चाकणकरांचे पोलिसांना पत्र?
संपादक दत्तात्रय खेमनर यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करताना सांगितले की, चाकणकर यांनी केवळ बदनामीची नोटीस पाठवली नाही, तर चक्क ‘खबरदार पुढारी’ हे वृत्तपत्रच बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले होते. चाकणकर यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी फोन केला नसल्याचा दावा केला असला, तरी त्यांच्या ‘सीडीआर’ (CDR) ची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असे आव्हान खेमनर यांनी दिले आहे. लोकशाहीचा विजय झाला असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चाकणकरांचा राजीनामा घेतल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
काय आहे चाकणकरांच्या पत्रातील मजकूर?
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या लेटरहेडवर पोलिसांना दिलेल्या पत्रात ‘खबरदार पुढारी’मधील बातमीचा उल्लेख केला होता. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, संपादक दत्तात्रय खेमनर यांनी ८ मार्च २०२५ रोजी आयोगाला दिलेल्या उत्तरात बातमी केवळ ऐकीव माहितीवर आधारित असल्याचे मान्य केले आहे. कोणताही पुरावा नसताना महिलांची बदनामी करणारे लिखाण केल्याचा ठपका ठेवत, खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि बदनामीकारक बातम्या देणारे हे वर्तमानपत्रच बंद करण्यात यावे, अशी मागणी चाकणकर यांनी या पत्राद्वारे केली होती.
कायदेशीर लढाई आणि पोलिसांकडे न्यायोचित मागणी
चाकणकर यांनी पाठवलेल्या पत्राला आणि कोणत्याही कायदेशीर नोटीसला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी संपादकांनी दर्शवली आहे. खरातच्या अटकेनंतर आता रोज नवनवीन खुलासे होत असताना, या प्रकरणाचा मूळ शोध लावणाऱ्या पत्रकारालाच धमकावले जात असल्याचा आरोप होत आहे. “आम्ही पुराव्यानिशी सत्य मांडले असून, चाकणकर खोटे बोलत आहेत,” असे म्हणत खेमनर यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. आता पोलीस या पत्रावर आणि संपादकांच्या तक्रारीवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


