Vijay Wadettiwar On Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या ‘युती-आघाडी’च्या गोंधळावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. विशेषतः ठाण्यातील भाजपच्या आक्रमक प्रचारामुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे सूचित करत, वडेट्टीवार यांनी त्यांना ‘ज्योतिषाचा’ सल्ला दिला आहे.
शिंदेंच्या मागे ‘शनी-राहू’चा फेरा?
ठाण्यात भाजपने सुरू केलेल्या स्वतंत्र प्रचार मोहिमेमुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. यावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या मागे सध्या राहू किंवा शनीचा दोष सुरू आहे का, हे त्यांनी एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडे जाऊन तपासावे. राहू-केतू त्यांना शांतपणे जगू देतील की नाही, अशी शंका सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून येत आहे.
हेही वाचा – मोठी घडामोड..! वसई-विरार महापालिका निवडणुकीत मनसे अन् बविआची युती; ठाकरे गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत
राजकारणाचा ‘चिखल’ झालाय
राज्यातील सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणावर वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी ‘कुणाचा पायपोस कुणाशी नाही’ अशी टीका केली. राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे की, या चिखलातील डाग कितीही धुतले तरी निघणार नाहीत, असे ते म्हणाले. जर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येत असतील, तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
वंचितसोबतच्या युतीचा पेच
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे 60 जागांची मागणी केल्याच्या वृत्तावर वडेट्टीवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन येत्या 2 दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.


