Municipal Election 2025: मुंबई आणि महाराष्ट्रातील एकूण २९ महापालिका, ज्यांत मुंबई महानगरपालिका देखील समाविष्ट आहे, या सर्वांसाठी निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीत एकूण २,८६९ जागांसाठी उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न करतील. निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होईल आणि निकाल १६ जानेवारीला जाहीर केला जाईल. राज्यातील महापालिका निवडणुकीत सुमारे ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत. संभाव्य दुबार मतदारांसाठी नावासमोर दुहेरी तारांकित चिन्ह (डबल स्टार) दिले जाईल. निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपल्यामुळे शहराचे प्रशासन सध्या प्रशासकांच्या हाती आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित असलेली मुंबई महापालिका निवडणूक विविध कारणांमुळे अनेकदा पुढे ढकलली गेली. जवळपास साडेतीन वर्षांनी अखेर मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांसाठी निवडणुकीचे पडघम वाजले आहेत.
मतदान कोणत्या महापालिकांमध्ये होणार?
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, नांदेड-वाघाळा, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर.
महापालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
- अर्ज दाखल करण्याची तारीख: २३ ते ३० डिसेंबर २०२५
- अर्जाची छाननी: ३१ डिसेंबर २०२५
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: २ जानेवारी २०२६
- निवडणूक चिन्ह वाटप: ३ जानेवारी २०२६
- मतदान: १५ जानेवारी २०२६
- निकाल जाहीर होणे: १६ जानेवारी २०२६
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
- अ वर्ग महापालिका: १५ लाख रुपये
- ब वर्ग महापालिका: १३ लाख रुपये
- क वर्ग महापालिका: ११ लाख रुपये
- ड वर्ग महापालिका: ९ लाख रुपये
विरोधकांचा आक्षेप
शिवसेनेने निवडणुकीची घाईत घोषणा केलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. अंतिम मतदार यादी अद्याप जाहीर झालेली नसताना निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ती आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा महापालिकेत उपलब्ध झाली नाही.


