मुंबई: राज्यातील काँग्रेसचे दोन टर्मचे आमदार, माजी मंत्र्यांचे सुपुत्र आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कुणाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ते धुळे ग्रामीणचे माजी आमदार आहेत. पाटील यांचं कुटुंब जवळपास ७० वर्षे काँग्रेससोबत राहिले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांचा पराभव झाला.
कुणाल पाटील यांच्या प्रवेशाने भाजपची धुळे जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. दोन टर्मचे आमदार राहिलेल्या कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील तब्बल सात वेळा आमदार निवडून आले होते. त्यांनी मंत्रिपद देखील भूषवले आहे. आता दूरदृष्टी ठेवून भारतीय जनता पक्षासोबत जात असल्याचे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे. काँग्रेससोबत गेली ७० वर्षे एकनिष्ठ राहिलो आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या पक्षात जाणं अवघड असल्याच्या भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवल्या.
दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात जबर धक्का बसला. २०१९ मध्ये २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले. त्याचवेळी काँग्रेसने १ वरुन १३ जागांवर मोठी झेप घेतली. काँग्रेसच्या या यशात जिल्हा पातळीवरील नेत्यांचा मोठा वाटा होता.


