सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करुन रस्त्यालगतच्या जमिनी शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत विकत घेतली. सदर जमिनी राष्ट्रीय महामार्गासाठी संपादन झाल्यानंतर त्यापोटी कोट्यवधी रुपये मिळविले आणि उर्वरित जमिनीचे क्षेत्र चढ्या दराने विक्री केली, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य लोकायुक्त यांच्याकडे करण्यात आली. ९ एप्रिल २०२५ रोजी त्याची सुनावणी होणार आहे, अशी माहिती तक्रारदार रविराज कदम यांनी दिली.
आमदार सुभाष देशमुख राज्याचे सहकार मंत्री, पणन व वस्त्रोद्योग मंत्री असताना आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करुन शेतकऱ्यांकडून रस्त्यालगच्या जमिनी कमी किंमतीत विकत घेत, राष्ट्रीय महामार्गच्या भूसंपादनच्या वेळी त्यातून कोट्यवधी रुपये मिळविले. तसेच उर्वरित जमिनी चढ्या दराने विक्री करत आर्थिक लाभ मिळविला. याबाबत आपण १४ जून २०२३ रोजी लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीस महसूल व वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनाही बोलावण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.


