शिर्डी: स्वतःच्या दोन चिमुकल्यांना साखळीने बांधून अनेक तास बेवारस सोडणाऱ्या एका महिलेचे कृत्य समोर आले आहे. ही हृदयद्रावक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अखेर या मुलांची सुटका करण्यात आली. या प्रकारामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
शिर्डी बस स्थानकाजवळील कम्पाऊंडमध्ये चार-पाच महिन्यांपासून एक महिला भंगार गोळा करण्यासाठी येत होती; मात्र आपल्या दोन वर्षांच्या आणि आठ महिन्यांच्या चिमुकल्यांना ती साखळीने बांधून कुलूप लावत असे आणि निघून जात असे. तासंतास बेवारस अवस्थेत रडणाऱ्या या मुलांकडे पाहून अनेकांचे काळीज पिळवटून जात होते.
हा प्रकार रोजच्या रोज सुरू असल्याने परिसरातील रहिवासी बाळासाहेब गायकवाड आणि अन्य नागरिकांनी महिलेला जाब विचारला. ‘तुला जर मुलांची काळजी घेता येत नसेल, तर त्यांना अनाथाश्रमात दे. तिथे त्यांची योग्य देखभाल होईल,’ असा सल्ला देऊनही ती ऐकण्यास तयार नव्हती. उलटपक्षी, ज्यांनी तिला समजवायचा प्रयत्न केला, त्यांनाच पोलिसांत तक्रार करण्याची धमकी ती देत होती. त्यामुळे नागरिकही असहाय्य झाले होते.
शुक्रवारी संतप्त नागरिकांनी एकत्र येऊन महिलेचा विरोध केला आणि मुलांची सुटका केली. हा प्रकार कोणीतरी मोबाईलवर कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला. घटनेला मिळालेल्या तीव्र प्रतिसादामुळे महिला घाबरली आणि तिने मुलांच्या गळ्यातील साखळी काढून मुलांना घेऊन तिथून पलायन केले.


