पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन अनियमितता प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील जमीन विक्रीदार शीतल तेजवानी गायब असून त्या विदेशात पसार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
या जमीन घोटाळ्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे, याचदरम्यान शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी ट्वीट करत महाराष्ट्र सरकारवर गंभीर टीका केली. त्यांनी गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन ही सरकारची नवी योजना असल्याचा आरोप केला.
‘नेत्यांना जमीन, गुन्हेगारांना जामीन’
रोहित पवारांनी ट्वीट करत महाराष्ट्र सरकारवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन ही सरकारची नवी योजना असल्याचा आरोप केला आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाने जमिनीचे अनेक गैरव्यवहार करून कोट्यवधी रुपयांच्या जमिनी लाटल्या आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
“गुन्हेगारांना जामीन – नेत्यांना जमीन” सरकारची नवी योजना
नवी मुंबईत शिंदे साहेबांचा गट – ५००० कोटीची सिडको जमीन
पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा –१८०० कोटीची जैन बोर्डिंग जमीन
पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा- ५०० कोटीची मोबोज हॉटेल कंपाऊंड इव्याकु प्रॉपर्टी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 9, 2025
आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्ट
“भाजपशी संबंधित प्रकरणे आली की, चौकशी आधीच क्लीन-चीट द्यायची आणि आपल्या दोन मित्रपक्षांची प्रकरणे असली की, राजकीय साटेलोटे करायचे. चौकशीचा बनाव करायचा. आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्ट, अशी भाजपची कार्यपद्धती आहे. राज्यात सुरू असलेल्या सर्व गैरप्रकारांना मुख्यमंत्री जबाबदार आहेत,” अशी टिकाही पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रात हे जे सर्व काही घोळ सुरू आहेत त्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून प्रामुख्याने मुख्यमंत्री जबाबदार असून आणि त्यांनी या सर्व घोळांची जबाबदारी घ्यावी. असो, मुख्यमंत्री या सर्वच प्रकरणांची कुठलाही भेदभाव न करता पारदर्शकपणे चौकशी करतील का? हे बघणं महत्वाचं ठरेल, असेही रोहित पवार म्हणाले.
जयकुमार गोरे यांचे प्रत्युत्तर
यावर आता अकलूजमध्ये जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील याचा विचार करावा आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. झोपण्यापूर्वी याचा शांतपणे विचार करुन झोपा”, असा इशारा जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांना दिला आहे.


