नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठीची रणनीती ठरवण्यात आली. याशिवाय देशातील वर्तमान राजकीय स्थितीवर चर्चा करण्यात आली.
ही बैठक आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘१० राजाजी मार्ग’ निवासस्थानी होणार होती. परंतु काही प्रमुख नेत्यांनी बैठकीसाठी दिल्लीत येण्यास असमर्थता व्यक्त केल्याने ऑनलाईन बैठक घेण्यात आली. सुमारे २० राजकीय पक्षांचे नेते बैठकीत सहभागी झाले होते. काँग्रेसकडून खरंगेंसह काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. आम आदमी पक्षाने मात्र आपण इंडिया आघाडीचा घटक नसल्याचे सांगत बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवरून धारेवर धरायचे, यावर बैठकीत चर्चा झाली. पहलगाम हल्ला, भारत-पाक संघर्षांतील नुकसान, शस्त्रसंधीतील अमेरिकेचा कथित सहभाग यांसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्पष्टीकरणाची मागणी अधिवेशनात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मुद्द्यांवर सरकारने संसदेत चर्चा करावी आणि पंतप्रधानांनी त्यामध्ये सहभागी होऊन उत्तर द्यावे, यासाठी विरोधक आग्रही आहेत.
याशिवाय बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या मुद्द्यावरून देखील विरोधक आक्रमक आहेत. विरोधकांकडून संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात येईल. परंतु त्यावेळी सरकार हा सर्व निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील विषय आहे आणि आयोग ही स्वायत्त संस्था आहे, असे सांगून हात वर करेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.


