पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल याना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे मंगलदास बांदल हे सहा महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार आहेत.
दरम्यान, ईडीने २१ ऑगस्ट २०२४ रोजी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानी कारवाई करीत साडेपाच कोटी रुपये जप्त केले होते. तसेच बांदल यांच्या ८५ कोटी किंमतीच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. मनीलॉडरींगसह अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल करण्यात आले होते. यापूर्वीही शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी २१ महिने तुरुंगवास भोगला आहे. त्यानंतर ईडीने अटक केल्याने बांदल हे सहा महिन्यांपासून कारावास भोगत आहेत. आता जमीन मंजूर झाल्याने त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


