जेजुरी: श्रीक्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांकरिता सोमवारपासून वस्त्र संहिता लागू झाली आहे. यापुढे भारतीय वेशभूषा असेल, तरच भाविकांना प्रवेश मिळेल, असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरुष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते म्हणाले की, मंदिराचे पावित्र्य, शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे अपेक्षित नाहीत. असे कपडे न घालण्याचे नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळ्ळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असे व तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव असेल.


