पुणे: राज्यात विधानपरिषदेच्या पाच आमदारांच्या रिक्त जागांवर येत्या 27 मार्चला निवडणूक होणार आहे. यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळणार आहे. या एका जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पिंपरी चिंचवडमधील खंदे समर्थक नाना काटेंनी दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना मला पुढे संधी दिली जाईल, असा शब्द अजित पवार यांनी दिला होता. आता हा शब्द ते या विधानपरिषद निवडणुकीत पाळतील आणि मला उमेदवारी देतील, असे म्हणत काटेंनी या जागेवर दावा ठोकला आहे.
तसेच मी बंडखोरी मागे घ्यावी, यासाठी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माझ्याशी संवाद साधला होता. त्यावेळी तुम्ही भाजपच्या शंकर जगतापांसाठी माघार घ्या, आम्ही भविष्यात तुमच्यासाठी कुठे तरी कामी येऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. आता तो क्षण आणि तो दिवस या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आल्याचे नाना काटे यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी चिंचवडचे आमदार शंकर जगताप हे माझ्यासाठी शब्द टाकतील आणि विधानसभेची परतफेड करतील, अशी अपेक्षा ही नाना काटेंनी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना नाना काटे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार निवडून आलेले आहेत. तसेच दोन आमदार विधान परिषदेवर आहेत. त्यामुळे सध्या घडीला येथे भाजपचे चार आमदार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केवळ एक आमदार आहे. राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवडमधील परिस्थिती पाहता, येथे पक्षाला अजून एक आमदार पाहिजे. पक्षातील नगरसेवक आणि नेत्यांनी माझ्यासाठी सहीची मोहीम राबवली आहे. त्याबाबतचे पत्र देखील तयार केले आहे. परंतु, आता अधिवेशन सुरु असल्यामुले अजित पवारांची भेट होत नाही. त्यांना मी निरोप दिलेला आहे. आम्ही सर्वजण लवकरच ते पत्र घेऊन पवार यांना भेटणार आहोत, अशी माहिती नाना काटे यांनी यावेळी दिली.
विधान परिषदेच्या पाच जागांपैकी एक जागा अजित पवार यांच्या पक्षाला मिळणार आहे. त्या जागेवर उमेदवारी मिळावी, अशी इच्छा माजी नगरसेवक नाना काटे यांची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत काही निर्णय घेतात? नाना गट यांना यावेळी संधी मिळणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.


