पुणे : पिंपरी-चिंचवडमधील शहरातील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली होती. महाविद्यालयाला ईमेलद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सध्या परीक्षांचे सत्र सुरू असल्याने महाविद्यालय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजेला आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे, धमकीच्या ई-मेलची तत्काळ दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह बॉम्बस्कॉडने देखील डी.वाय. पाटील महाविद्यालयात सर्वत्र तपासणी केली. यावेळी, त्यांच्यासमवेत डॉगस्कॉड देखील दिसून आले. दरम्यान, कोणीतरी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान बॉम्ब संदर्भातील ईमेल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढण्यात आल्याने एकच गोंधळ झाला. आज (दि. 11) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा ई-मेल येताच पोलिस कंट्रोल रुमला महाविद्यालय प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. त्यानंतर, बिडीडीएसचे पथक तातडीने महाविद्यालयात दाखल झाले. जवळपास तीन तास बॉम्बस्कॉड पथकाडून तपासणी व शोधमोहिम सुरू होती. त्यांच्या शोधकार्यात संपूर्ण महाविद्यालय परिसरात कुठेही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे कोणी तरी हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्या या अज्ञाताचा शोध सुरु करण्यात आला आहे.


