मुंबई: कल्याण लोकलमध्ये मराठी बोलला नाही, या कारणामुळे मारहाण झाल्यानंतर मुलुंडमधील केळकर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षांच्या अर्णव खैरेने आत्महत्या केली. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला. अर्णवचे कुटुंबिय या प्रकरणात न्याय मागत आहेत. सदर प्रकरणावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी भाष्य केले आहे.
माध्यमांनी अर्णव खैरे प्रकरणावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मुंबईत परप्रांतियांची दादागिरी वाढली आहे. ही दादागिरी मोडून काढण्याचे काम महाराष्ट्रातील सर्व मराठी जनांनी एकत्र येऊन केले पाहिजे. परप्रांतीयांना पाठिंबा देणारे लोक आता मूग गिळून का गप्प बसले आहेत, हा आमचा प्रश्न आहे. हे लोक या प्रकरणावर का बोलत नाहीत?”
कल्याणमधील मराठी मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करणार आहे. जे कुणी दोषी आहेत, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहीजे, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. सदर घटनेचे समर्थन होऊच शकत नाही, आम्ही पूर्णपणे अर्णव खैरेच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत, असे देशपांडे यांनी सांगितले.
नेमके प्रकरण काय?
अर्णव खैरे मुलुंडमधील केळकर महाविद्यालयात बीएससीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. तो दररोज कल्याण रेल्वे स्थानकातून अंबरनाथहून येणाऱ्या 8.40 च्या लोकलने मुलुंड येथे जात होता. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे अर्णवने लोकल पकडून मुलुंडचा प्रवास सुरू केला. लोकलमध्ये खूप गर्दी होती. अंगावर गर्दीचा दाब येत असल्याने अर्णवने कल्याण ते ठाणे दरम्यान आपल्या समोरील प्रवाशाला ‘थोडा आगे हो’ असे बोलला. त्यावेळी त्या प्रवाशाना ‘काय रे तुला मराठी येत नाही का? तुला मराठी बोलण्याची लाज वाटते का?’ असे प्रश्न केले. त्यावेळी अर्णवने तो मराठी असल्याचे सांगितले. यानंतर प्रवाशासह त्याच्या इतर पाच साथीदार टोळक्याने अर्णवला ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या टोळक्याच्या दहशतीला घाबरून अर्णव ठाणे रेल्वे स्थानकात उतरला. तेथून तो मागील लोकलने मुलुंडला गेला. महाविद्यालयातील प्रक्टिकल उरकून तणावामुळे तो तेथे पूर्ण वेळ न थांबता घरी परतला. पोटात आणि इतर भागात बेदम मारहाण झाल्याने अर्णवला मळमळ आणि अस्वस्थ वाटत होते. त्याने वडिलांना फोन करून याची माहिती दिली.
वडील लक्ष्मण खैरे यांनी त्याला घरी जाण्याचा सल्ला दिला. संध्याकाळी लक्ष्मण खैरे जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून ते आत गेले असता त्यांना धक्काच बसला. अर्णवने छताला ओढणीने गळफास घेतला होता.
खासदार श्रीकांत शिंदेंनी अर्णवच्या वडिलांशी साधला संवाद
शिवसेना (शिंदे) गटाच्या वतीने शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी अर्णवचे वडील लक्ष्मण खैरे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी लक्ष्मण खैरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. अर्णव आत्महत्या प्रकरणात सखोल चौकशी करून पीडित कुटुंबीयाला न्याय द्या, अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पोलिसांना दिली असल्याची माहिती निलेश शिंदे यांनी दिली.


