धाराशिव: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी हा पत्त्यांचा खेळ खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे . हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या एका विधानाने आता कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खासदार तटकरे म्हणाले की, चार-पाच वेळा माणिकराव कोकाटे यांची वक्तव्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अयोग्य पद्धतीची आली आहेत. राष्ट्रवादी पक्षाने गांभीर्याने त्याची नोंद घेतली. कोकाटे यांना एक-दोनदा अजित दादांनी समजही दिली. पण आता जो व्हिडिओ बाहेर आला आहे, त्यावर माणिकरावांनी जरी त्यात काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला असेल, तरी तोसुद्धा काही योग्य आहे, असं मला वाटत नाही.” असंही तटकरे म्हणाले.
“राज्यातील शेतकऱ्यांवर जे काही संकट कोसळले आहे. एक तर सुरुवातीला मे महिन्यात पाऊस आला, यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. परत पावसाची ओढ लागली, पुन्हा दुसऱ्यांदा पेरण्या कराव्या लागल्या. सध्या शेतकरी संकटात असताना, कृषी सारख्या महत्त्वाचा आणि संवेदनशील विभाग असणाऱ्या मंत्र्याने योग्य पद्धतीने सतत शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. कोकाटे यांच्याकडून जे घडलंय, ते अयोग्य आहे, असं मला नक्की वाटतं. पण शेवटी राष्ट्रवादी पक्षसुद्धा त्यांच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल,” असं सूचक विधान तटकरे यांनी केले आहे.
आता खासदार तटकरे यांच्या सूचक विधानानुसार माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांत चर्चा होणार आहे. त्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा की नाही, हे ठरवले जाईल. मात्र तटकरेंच्या विधानानंतर आता भविष्यात आणखी एक राजीनामा पडणार का? याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.


