Girish Mahajan On Tapovan Tree Cutting: नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे पर्यावरणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवनमध्ये साधुग्राम उभारण्यात येणार असून, यासाठी काही प्रमाणात वृक्ष हटवावे लागणार आहेत. अंदाजे 1,800 झाडांवर या कामाचा परिणाम होणार असल्याने पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.
15 हजार झाडांच्या लागवड
या पार्श्वभूमीवर सरकारने पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून 15 हजार झाडांच्या लागवडीचा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे पदाधिकारी तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरातील विविध आखाड्यांचे महंत उपस्थित होते. शहरातील चार ठिकाणी ही वृक्षलागवड करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात एक हजार झाडे लावली जाणार आहेत.
हेही वाचा – Tapovan Tree Cutting: तपोवन वृक्षतोडीवर मोठी कारवाई; राष्ट्रीय हरित लवादाकडून तात्पुरती स्थगिती
हरीगिरी महाराज यांच्याकडून पर्यावरण रक्षणाचा संदेश
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी महाराज यांनी यावेळी पर्यावरण रक्षणाचा संदेश देताना सांगितले की, कुंभमेळ्यासारख्या भव्य धार्मिक सोहळ्यासोबत निसर्गसंवर्धनालाही तेवढेच महत्त्व दिले पाहिजे. तपोवनमध्ये काही झाडे काढली जात असली तरी त्या बदल्यात अधिक प्रमाणात वृक्षारोपण आणि शक्य तिथे झाडांचे पुनर्रोपण करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने हिरवळ वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, विकासकामांना विरोध करणाऱ्या काही गटांवर टीका करताना हरीगिरी महाराज यांनी सांगितले की, काही विचारसरणी विकास प्रकल्पांना अडथळे निर्माण करत आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुमारे 150 किलोमीटर परिसरात पायाभूत सुविधा विकसित होणार असून त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनाही होणार आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Anna Hazare: कुंभमेळा समाजहिताचा असला तरी झाडे तोडू नका! तपोवन वृक्षतोडीच्या वादात अण्णा हजारेंची उडी
गिरीश महाजन यांचा विरोधकांना इशारा
मंत्री गिरीश महाजन यांनीही यावेळी भूमिका स्पष्ट करत सांगितले की, साधुग्राम उभारणीसाठी जितकी आवश्यकता असेल तितकीच झाडे हटवली जातील आणि त्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात इतर ठिकाणी पुनर्रोपण केले जाईल. मागील कुंभमेळ्यात लावलेल्या झाडांपैकी सुमारे 80 टक्के झाडे आजही तग धरून असल्याचा दाखला त्यांनी दिला. झाडतोडीबाबत गैरसमज पसरवले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कुंभमेळ्याची गरज काय, साधू संत गांजा प्यायला येतात हे बोलणं आम्ही खपवून घेणार नाही. काही वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला असला तरी कुंभमेळ्याची गरज आणि धार्मिक परंपरांचे महत्त्व कोणीही कमी लेखू नये, असे स्पष्ट करत गिरीश महाजन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पर्यावरण संवर्धनाचे समर्थक आहेत. लावण्यात येणारी 15 हजार झाडे पूर्णपणे सुरक्षित राहतील, याची जबाबदारी शासन घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.


