Municipal Elections: राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान करत संभाव्य एकत्रित लढतीचे संकेत दिले आहेत. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तसेच, आज आपण स्वतः राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले की, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर मराठी अस्मितेच्या रक्षणासाठीची निर्णायक लढाई आहे. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो वा कोणत्याही परिस्थितीत असो, त्याने मुंबई वाचवण्यासाठी या संघर्षात सहभागी व्हायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईत अलीकडेच ‘मुंबई वाचवा’ या आशयाचे पोस्टर्स झळकल्यानंतर सरकारने ते हटवण्याचे आदेश दिल्याचा आरोप करत राऊत यांनी आचारसंहितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठी माणसासाठी नियम कडक आणि सत्ताधाऱ्यांसाठी सवलत का, असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधारी पक्षांच्या खर्चावरही संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. निवडणूक जाहीर होण्याच्या अगदी आधीपर्यंत शासकीय निधीचे आदेश, विकासाच्या घोषणा सुरू होत्या, मग हा आचारसंहितेचा भंग नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, १५ लाखांच्या खर्च मर्यादेचे सत्ताधारी पक्ष खरोखर पालन करतील का, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कोट्यवधींचा खर्च आणि नगरसेवक फोडण्यासाठी मोठ्या रकमांचा वापर झाल्याचे आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाने यावर कोणती ठोस यंत्रणा राबवणार, असा सवाल केला.
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘पैशांचा खेळ होऊ द्या, मागून वार करा, पण आम्ही आमची लढाई सोडणार नाही. मुंबई वेगळी करण्याचा आणि ती उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव काही शक्ती खेळत आहेत. अशा वेळी मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन मुंबईसाठी लढले, अशी नोंद इतिहासात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी?
युतीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, औपचारिक घोषणा अद्याप झालेली नसली, तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीतील पक्षांना युतीसाठी दिल्लीची पायरी चढावी लागते, मात्र ठाकरे बंधू स्वबळावर आणि स्वाभिमानाने एकत्र आले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. इतर महापालिकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही लढाई २९ महापालिकांपेक्षा मुंबईच्या अस्तित्वाची आहे, असे सांगत राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संदर्भ दिला.
हेही वाचा – Pune Land Scam: पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर संजय राऊतांचं मोठं भाष्य; अजित पवारांवर थेट प्रहार, म्हणाले…
मुंबई कोणाच्या घशात घालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येत्या आठवड्यात युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते, असे संकेत देत संजय राऊत यांनी काँग्रेसवरही अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईच्या लढाईत काँग्रेसने आमच्यासोबत ठामपणे उभे राहायला हवे होते, अशी भूमिका मांडत त्यांनी स्थानिक नेत्यांना भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊ नये, असा इशारा दिला. दरम्यान, आज होणारी राज ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या भेटीत नेमकी कोणती दिशा ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


