Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नेमला न जाण्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असल्यामुळे भाजपला धडकी भरली असून, अमित शाहांसह सर्व नेते हादरले आहेत, असा दावा राऊतांनी केला. विरोधी पक्षनेत्याशिवाय कामकाज चालवण्याचा अर्थ भाजप विरोधी पक्षाला घाबरतो, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, संसदीय लोकशाहीत महानगरपालिका, जिल्हा परिषद ते संसदेपर्यंत विरोधी पक्षनेता असणे हे संविधानाची आवश्यकता आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी-शाह यांनी विरोधी पक्षनेता नसावा अशी रणनीती आखली आहे. दिल्लीत राहुल गांधींमुळे २४० खासदार निवडून आल्याने विरोधी पक्षनेतेपद टाळता आले नाही, पण महाराष्ट्रात दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
मुंबई-विदर्भ तोडण्याचा प्रयत्न आणि गुजरातचा अजेंडा
राऊत म्हणाले की, सध्या मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ वेगळा करण्याचा अजेंडा असल्याचे सांगतात आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतात. शिंदे गटाचे एकही आमदार यावर बोलले नाहीत, याचा अर्थ ते अमित शाहांचे ‘मिंधे’ आहेत. फडणवीस सरकार हे गुजरातचे ‘मिंधे’ आहे. गुजरात बॉर्डरवर घुसखोरी होत असून, उंबरगाव, डहाणू, पालघर गुजरातच्या अजेंड्यावर आहेत. बुलेट ट्रेन पालघरमधून काढली आहे. मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत.
महायुती आणि शिंदे गटावर टीका
महायुती म्हणजे भाजप आणि खरी शिवसेना नव्हे, तर डुप्लिकेट पक्ष अमित शाहांचा आहे. एकनाथ शिंदेंची ताकद नाही, ते भाजपच्या मतांवर आणि पैशावर अवलंबून आहेत. शिंदेंना फडणवीसांना चेकमेट करण्यासाठी अमित शाह टॉनिक देतात, पण फडणवीसांना दिल्लीला येऊ द्यायचे नाही, असं राऊत म्हणाले.
अजित पवार आणि पार्थ पवारवर निशाणा
अजित पवार म्हणतात अधिकाऱ्यांनी फाइलमध्ये तारतम्य नसल्याचे सांगायला हवे. पार्थ पवारांचे इतके वजन आहे की कोणाची हिंमत नाही सांगण्याची? जय शाहाला मार्गदर्शन करण्याची हिंमत कोणाची? मोदींनी अजित पवार आणि प्रफुल पटेलांना वाचवले, अशी टीका संजय राऊतांनी केली. या पत्रकार परिषदेने राजकीय वातावरण तापले असून, हिवाळी अधिवेशनात यावरून रणकंदन होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते नेमण्याचा मुद्दा सध्या महाराष्ट्र विधिमंडळात प्रलंबित असून, महाविकास आघाडीने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.


