जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे धंगेकरांनी हा मुद्दा लावून धरला आहे. अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत. त्यातच दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव न घेता त्यांना सुचक इशारा देत टोला लगावला आहे. मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, असे सूचक वक्तव्य त्यांनी करत फडणवीसांवर देखील निशाणा साधला आहे.
यात त्यांनी अनेक भाजप नेत्यांची नावे गोवली आहेत. विनोद तावडे ते मुरली अशी यादीच अंधारे यांनी ट्विट केली आहे. त्यामध्ये ‘मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फोडला. सगळ्यात आधी विनोद तावडे, मग पंकजा मुंडे पाठोपाठ सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय..गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतलीय…अब तेरा क्या होगा मुरली ?’, असा प्रश्न विचारला आहे.
सुषमा अंधारे यांनी आपले हे ट्विट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी टॅग केले आहे. तसेच सिंहासन, सारे काही खुर्चीसाठी असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. तीन दिवसांपूर्वी अंधारे यांनी ट्विट करत शनिवार वाड्यावरील खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मोर्चाची खिल्ली उठवत जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे म्हटले होते.
मोहोळ यांनी घेतली जैन मुनींची भेट
शनिवारी मुरलीधर मोहोळ यांनी शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगला भेट देत आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांच्यासह समाज बांधवांशी संवाद साधला. जैन बांधवांसमवेत सदैव असून येत्या १ तारखेपर्यंत समाजाची मागणी पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले.


